तुम्ही फक्त इशारा करा, लगेच लागेल कॉल; सॅन फ्रान्सिस्कोत सादर झाले नवे तंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:24 AM2023-11-12T09:24:17+5:302023-11-12T09:24:46+5:30
मोबाइलच्या पुढची पायरी
सॅन फ्रान्सिस्को : मोबाइल क्रांतीने तर जग आरपार बदलून टाकले आहे. तळहातात मावणाऱ्या या उपकरणाने ‘बेसिक ते स्मार्टफोन’ असा प्रवास करत अख्खे जग तुमच्या हाती आणले आहे. सॅन फ्रान्सिस्कोची ‘ह्युमेन’ कंपनी यात सर्वांत पुढे आहे. तिने या श्रेणीतील आपले पहिले उपकरण (डिव्हाइस) ‘एआय पिन’ सादर केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणारे हे स्मार्ट उपकरण भविष्यात स्मार्टफोनचा पर्याय होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
हे उपकरण शर्ट किंवा जाकिटावर पिनप्रमाणे लावले जाऊ शकते. त्यात ना कोणते ॲप आहे ना स्क्रीन. केवळ आवाज व हातांच्या इशाऱ्याद्वारे ते चालविले जाऊ शकते. दोन बाय दोन इंच एवढा आकार असलेल्या एआय पिनचे वजन ३४ ग्रॅम आहे. ते व्हर्च्युअल एआय असिस्टंटने युक्त आहे. जे मॉयक्रोसॉफ्ट आणि ओपन एआयच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याला ॲक्टिव्हेट करण्यासाठी टच पॅडला ड्रॅग करून टॅप करावे लागेल. कॉल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि ते प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते. (वृत्तसंस्था)
किंमत किती?
एआय पिन तीन रंगात उपलब्ध होईल. त्याची किंमत ५८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबत महिन्याचे दोन हजार रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. यात फोन नंबर आणि डेटा कव्हरेज मिळेल. उपकरणात बॅटरीची सुविधा असेल.हे उपकरण पुढील वर्षी बाजारात उतरविण्याची तयारी सुरू आहे.
काय काय करू शकते ही छोटी डबी?
एआय पिन तुम्हाला विविध सेवांशी जोडते. त्यात हिरव्या रंगाचा लेझर प्रोजेक्टर असून, तो माहिती, विवरण वापरकर्त्याच्या हातावर होलोग्राफिक रूपात प्रोजेक्ट करू शकतो. हे उपकरण सर्च करू शकते. यात ब्लूटूथ सुविधाही आहे. हे उपकरण १३ मेगापिक्सलची छायाचित्रे घेण्यासह नोटिफिकेशन व अलर्टही देऊ शकते. यात व्हिडीओ रेकाॅर्डिंगचे ऑप्शनही येईल. याद्वारे छायाचित्रे आणि मजकूरही पाठवला जाऊ शकतो.