दाढी वाढवली म्हणून तरुणाला सहा वर्षांचा तुरुंगवास
By Admin | Published: March 30, 2015 11:59 AM2015-03-30T11:59:47+5:302015-03-30T12:01:33+5:30
चीनमध्ये ३२ वर्षीय तरुणाने दाढी वाढवली म्हणून त्याला चक्क सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर बुरखा घालणा-या त्याच्या पत्नीला दोन वर्षांसाठी तुरुंगात धाडण्यात आले आहे.
>
ऑनलाइन लोकमत
शिनझियांग, दि. ३० - चीनमध्ये ३२ वर्षीय तरुणाने दाढी वाढवली म्हणून त्याला चक्क सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर बुरखा घालणा-या त्याच्या पत्नीला दोन वर्षांसाठी तुरुंगात धाडण्यात आले आहे.
चीनमधील शिनजियांग या मुस्लीम बहुल भागात दाढी वाढवणे व बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार उगर समाजातील संबंधीत दाम्पत्त्य २०१० पासून या नियमांचे उल्लंघन करत आहे. या दाम्पत्त्याला अनेकदा कारवाईचा इशाराही देण्यात आला. मात्र दोघांनीही या इशा-याकडे दुर्लक्ष केले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यापासून शिनझियांगमधील प्रशासनाने सरकारी नियम मोडणा-यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यानुसार संबंधीत दाम्पत्त्याला रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने तरुणाला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणे व संघर्ष निर्माण करणे या कलमांखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमधील शिनझियांग प्रांतामध्ये प्रोजेक्ट ब्यूटी ही योजना राबवली जात असून यामध्ये महिलांनी बुरखा घालू नये व पुरुषांनी दाढी वाढवू नये यासाठी जनजागृती केली जाते.