१०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा
By admin | Published: October 29, 2015 12:45 AM2015-10-29T00:45:28+5:302015-10-29T00:45:28+5:30
सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे
ओपॅटोवॅक (क्रोएशिया): सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लहान मुले, तरुण, नवविवाहित, मध्यमवयीन लोकांनी मातृभूमी सोडून परागंदा होण्याचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला. या स्थलांतरितांमध्ये अफगाणिस्तानातील एक १०५ वर्षांच्या आजींचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे. लहानसहान संकटामुळे जीवनाची आशा सोडणाऱ्या तरुणांची उदाहरणे डोळ्यांसमोर असताना या वयात अजूनही चांगल्या जीवनाच्या आशेने युरोपात २० दिवसांचा खडतर प्रवास करून आलेल्या या आजींचा प्रवास तितकाच रोमांचकारक आहे.
बिबिहाल उझबेकी या अफगाणिस्तानातील कुडुंझ या गावातील १०५ वर्षांच्या आजी आहेत. तालिबानने नुकताच या शहरावर ताबा घेत पुन्हा शरिया कायदा लादला आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून बिबिहाल आजी आणि त्यांच्या १७ जणांच्या कुटुंबाने अफगाणिस्तान सोडून युरोपात जाण्याचा निर्णय घेतला. वयपरत्वे हालचालींवर मर्यादा आलेल्या असूनही बिबिहाल आजींनीही युरोपात जाण्याचा निश्चय केला. या २० दिवसांच्या खडतर प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ६७ वर्षांच्या मुलाच्या आणि १९ वर्षांच्या नातवाच्या पाठुंगळी बसून त्यांनी अखेर क्रोएशियात प्रवेश केला आहे.
प्रवासाविषयी बोलताना बिबिहाल आजी फारसीतून सांगतात, माझे पाय फारच दुखतात, मी एक दोनदा खालीही पडले, त्याच्या खुणाही माझ्या डोक्यावर आहेत, पण मी जिद्द सोडली नाही. क्रोएशियामध्ये प्रवेश केल्यानंतर उझबेकी कुटुंबाची कागदपत्रे तपासण्यात आली. आता स्लोव्हेनिया आणि शेवटी स्वीडनला जाण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांचा नातू मुहामदने सांगितले.