नोकरीसाठी मुलाखतीला गेलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू; कारण ऐकून हादरून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:59 PM2022-02-05T13:59:55+5:302022-02-05T14:01:33+5:30
मुलाखतीसाठी कारखान्यात गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांचे गंभीर आरोप
बोरिसोव: एखाद्या व्यक्तीला मृत्यू कसा गाठेल सांगता येणार नाही. बेलारुसमधील बोरिसोव शहरात एका कारखान्यात असाच प्रकार घडला. २१ वर्षांची तरुणी नोकरीच्या मुलाखतीसाठी कारखान्यात गेली होती. मुलाखतीनंतर एक कर्मचारी तिला कारखाना दाखवण्यासाठी घेऊन गेला. कारखान्यात तार आणि इलेक्ट्रोड्ससारख्या उत्पादनांची निर्मिती होते.
कोणत्या यंत्रावर काय काम चालतं, उत्पादन कसं होतं, याची माहिती कर्मचारी तरुणीला देत होता. दरम्यान कर्मचारी रजिस्टरमध्ये काही नोंदी करण्यासाठी थांबला. काही मिनिटांनंतर तो मागे वळला. तेव्हा तरुणी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तरुणीचं नाव उमिदा नजारोवा होतं. तिचे केस लांबसडक होते. कारखान्यातील एका यंत्राच्या शेजारी उभी असताना तिचे केस त्या यंत्रात अडकले. यंत्रात केस खेचले गेल्यावर ते तिच्याच गळ्याभोवती फासासारखे आवळले गेले.
उमिदाचा गळा केसांमुळे आवळला गेला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कर्मचाऱ्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं. तिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र २० दिवस तिला शुद्ध आली नाही. मृत्यूशी २० दिवस झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा आरोप तिचे वडील दिमित्री यांनी केला.
उमिदाचे केस लांब होते. त्यामुळे तिला यंत्राजवळ नेण्यापूर्वी ते कव्हर करायला हवे होते. तशी सूचना कर्मचाऱ्यांनी करायला हवी होती. कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दोन जीवांचा मृत्यू झाला. कारण आमची मुलगी ७ महिन्यांची गर्भवती होती, असं दिमित्री म्हणाले. या प्रकरणी न्यायालयानं कारखान्याच्या प्रमुखाला जबाबदार धरत शिक्षा सुनावली.