यूट्यूब प्रसन्न... आठ वर्षांची मुलगी कमवते महिन्याला ८० लाख
By admin | Published: April 20, 2015 01:14 PM2015-04-20T13:14:47+5:302015-04-20T13:18:00+5:30
सिडनीत राहणा-या मिनी मार्था स्टिव्हर्ट या आठ वर्षाच्या चिमूरडीने यूट्यूबवर पाककृतीच्या चॅनेलच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची कमाई केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २० - वय वर्ष अवघे आठ.... छंद घरात पाककृती करुन त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकणे... महिन्याची कमाई १ लाख २७ हजार डॉलर्स (भारतीय चलनानुसार ८० लाख रुपये).. ऑस्ट्रेलियात राहणा-या मिनी मार्था स्टिव्हर्ट उर्फ चार्ली या चिमुकलीची ही कमाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मिनी मार्था स्टिव्हर्ट ही चिमुरडी यूट्यूबवर फूड चॅनल चालवते. यूट्यूबवर मिनी मार्था ही चार्ली या नावाने प्रसिद्ध असून चार्लीज क्राफ्टी किचन हे तिच्या यूट्यबू चॅनलचे नाव आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार फूड कॅटेगरीत चार्लीचे चॅनेल हे सर्वात लोकप्रिय असून या चॅनलच्या माध्यमातून तिची महिन्याला तब्बल १ लाख २७ हजार डॉलर्सची कमाई होते. यूट्यूबवर फूड कॅटेगरीत पाककृतीचे चॅनल चालवणा-या अन्य ख्यातनाम शेफवरही चार्लीने मात केली आहे. यूट्यूबवर सेलिब्रीटी शेफ जॅमी ऑलिव्हबर यांची महिन्याची कमाई ३२ हजार डॉलर्स ऐवढीच आहे.
चार्ली व्हिडीओच्या माध्यमातून केक, पेस्ट्री बनवण्याच्या सोप्या पद्धती लोकांना सांगते. तिच्या या व्हिडीओजना दररोज सुमारे २९ मिलीयन लोकं बघत असल्याने या चॅनलवर जाहित देणा-यांची संख्याही जास्त आहे. हे जाहिरातदार यूट्यूबला पैसे देतात व यूट्यूब त्यातील वाटा चार्लीला देतात.
मिनी मार्था ६ वर्षांची असल्यापासून तिला पाककलेची आवड आहे. मुलीची ही आवड बघून तिच्या आईने यूट्यूबवर चार्लीज क्राफ्टी किचन या नावाने चॅनेल सुरु केले. मिनी मार्थाने बनवलेल्या पदार्थांची चव तिची लहान बहिण अॅश्ले चाखून बघते व तो पदार्थ चांगला झाला की नाही हे सांगते. अवघ्या दोन वर्षांत हे चॅनल चांगलेच लोकप्रिय झाले व मिनी मार्थाच्या कमाईचा आकडाही वाढला.