फेसबुकपाठोपाठ यूट्युब अडचणीत; बालसुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 10:39 AM2018-04-10T10:39:39+5:302018-04-10T10:39:39+5:30
२३ संस्थांची यूट्युबविरोधात तक्रार
केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणामुळे फेसबुकवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली असताना आता यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. अमेरिकेतील २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. १३ वर्ष वयापर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करुन बालसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थांनी यूट्युबवर केला आहे.
यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांची माहिती गुगलकडून गोळा केली जाते. या मुलांचे लोकेशन, डिव्हाईस, फोन नंबर अशी माहिती गोळा करुन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते. याशिवाय ही माहिती गोळा करताना मुलांच्या पालकांची परवानगीदेखील घेतली जात नाही. यामुळे अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे (Coppa) उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढणाऱ्या संस्था, जागरुक ग्राहक आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका असलेले गट अशा एकण २३ संस्थांनी मिळून यूट्युबविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांच्या ग्रुपमध्ये कॅम्पेन फॉर कमर्शियल-फ्री चाईल्डहूड (CCFC) आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी या महत्त्वाच्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे यूट्युबविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
५ कोटी वापरकर्त्यांची माहिती लिक झाल्याने काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर टीकेची झोड उठली होती. डेटा लिक झाल्याने निर्माण झालेले हे वादळ अद्याप शमलेले नाही. केंब्रिज अॅनॅलिटिका या कंपनीला वापरकर्त्यांचा डेटा दिल्याचा आरोप फेसबुकवर आहे. याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने माफीदेखील मागितली होती. आता फेसबुकपाठोपाठ यूट्युबदेखील अडचणीत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.