युनूस सरकारचा आज शपथविधी, भारतीय उच्चायुक्तालयातील महत्त्वाचे वगळता अन्य कर्मचारी मायदेशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 06:38 IST2024-08-08T06:38:37+5:302024-08-08T06:38:59+5:30
बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड झाल्याच्या घोषणेनंतरही त्या देशातील अराजक स्थिती बुधवारीदेखील कायम होती.

युनूस सरकारचा आज शपथविधी, भारतीय उच्चायुक्तालयातील महत्त्वाचे वगळता अन्य कर्मचारी मायदेशी
ढाका : नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये समावेश असलेले नेते यांचा गुरुवारी शपथविधी होईल असे त्या देशाचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी बुधवारी जाहीर केले.
बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड झाल्याच्या घोषणेनंतरही त्या देशातील अराजक स्थिती बुधवारीदेखील कायम होती. तसेच ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयातील महत्त्वाचे वगळता अन्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय बुधवारी भारतात परतले आहेत.
१५ सदस्यांचे मंडळ
लष्करप्रमुख वकार-उझ-झमान म्हणाले की, अंतरिम सरकारचे सल्लागार मंडळ हे १५ सदस्यांचे असण्याची शक्यता आहे. यूनस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी निवड केली.
बांगलादेश बँकेच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे
बांगलादेश बँकेचे डेप्युटी गव्हर्नर काझी सय्यदुर रहमान यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राजीनामे दिले आहेत. बांगलादेश बँकेचे गव्हर्नर व काही डेप्युटी गव्हर्नर हे बँकेचे नुकसान करणाऱ्यांनाच मदत करत आहेत, असा आरोप तेथील अधिकाऱ्यांनी केला होता. त्यांनी गव्हर्नरच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता.