झाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:47 AM2019-08-20T00:47:35+5:302019-08-20T00:47:48+5:30
मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी नाईकच्या वक्तव्यांवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
कुआलालंपूर : कट्टरपंथी विचारांनी लोकांची माथी भडकावणे व ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या आरोपांवरून तीन वर्षे भारतास हवा असलेला इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याने त्याला आश्रय देणाऱ्या मलेशियातही तेथील समाजात वांशिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून यजमान सरकारची नाराजी ओढवून घेतली आहे. मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी नाईकच्या वक्तव्यांवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मलेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश असून, येथे चिनी व हिंदू अल्पसंख्य आहेत. मलेशियाने नाईकला कायम रहिवाशाचा दर्जा दिलेला आहे. कोटा बारू येथील भाषणातमलेशियातील हिंदू व चिनी वंशाच्या समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्याची भारतात रवानगी करण्याची मागणी होत आहे. मलेशियातून आपली हकालपट्टी करण्याच्या मागणीचा संदर्भ देत कोटा बारूच्या भाषणात नाईकने असे कथित विधान केले की, मलेशियातून प्रथम चिनी वंशाच्या लोकांना काढायला हवे कारण तेच येथील सर्वात जुने पाहुणे आहेत. त्या भाषणात नाईक असेही म्हणाला की, मलेशियातील हिंदू भारतातील मुस्लिमांहून १०० पट अधिक हक्क उपभोगतात व त्यांचा मलेशियन सरकारपेक्षा भारत सरकारवर जास्त विश्वास आहे.
पंतप्रधान महाथिर मोहम्मद म्हणाले की, कायम रहिवासी असलेल्या नाईकने राजकीय वक्तव्ये न करणे अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)
अनेक प्रांतांत भाषणबंदी
- पोलिसांनी झाकीर नाईकवर शांतताभंग व्हावा यासाठी विशिष्ट समाजांचा हेतूपुरस्सर अपमान केल्याचा आरोप केला असून त्याची चौकशी सुरू आहे. नाईकच्या या वक्तव्यांनंतर जोहोर, सेलांगोर, पेनांग, केदाह, सारावाक आणि मेलाका या प्रांतांंनी त्याला भाषणे करण्यास बंदी लागू केली आहे.