झाकीर नाईकने मानले महातीर यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:38 AM2018-07-09T04:38:26+5:302018-07-09T04:39:02+5:30
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
कौलालंपूर - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या संदर्भातील छायाचित्र नाईक याच्या वकिलांनी रविवारी जारी केले आहे.
झाकिर नाईक २०१६ साली भारतातून मलेशियाला पळून गेला. मलेशियाने त्याला कायमस्वरूपी नागरिकत्व बहाल केले आहे. त्याच्या कृत्यांनी मलेशियामध्ये जोवर काही समस्या निर्माण होत नाहीत, तोवर आम्ही त्याला भारताच्या हवाली करणार नाही असे महातीर मोहम्मद यांनी म्हटले होते. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याचा, तसेच विद्वेष फैलाविणारी भाषणे केल्याचा आरोप भारतीय तपासयंत्रणांनी झाकीर नाईकवर ठेवला आहे.
झाकीरला भारताच्या हवाली न करण्याच्या निर्णयाचे पार्टी प्रिभूमी बेरसातू मलेशिया (पीपीबीएम) या सत्ताधारी पक्षाने समर्थनच केले आहे. झाकीरला भारताकडे सोपविल्यास उघुर मुस्लिमांना चीनच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेणेही मलेशियाला भाग पडेल. त्यामुळे महातीर मोहम्मद यांनी असा निर्णय घेतला असावा. पीपीबीएमचे नेते रईस हुसेन यांनी सांगितले की, झाकिर नाईकचे कार्य व भाषणे यात आम्हाला आक्षेपार्ह आढळलेले नाही. आपण भारतात परतणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे झाकिर नाईक याने एका निवेदनात म्हटले होते.