रुहानींच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, पेट्रोलियम मंत्रीपदी पुन्हा झांगरेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 04:42 PM2017-08-08T16:42:27+5:302017-08-08T16:47:37+5:30
19 मे रोजी झालेल्या 12 व्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हसन रुहानी यांना 57 टक्के मतदान झाले आणि त्यांना सलग दुसऱ्यांना सत्तेमध्ये येता आले. शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडला.
तेहरान, दि. 8- इराणच्या अध्यक्षपदावर पुन्हा निवडून आलेल्या हसन रुहानी यांनी आपले मंत्रिमंडळ आज जाहीर केले. या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेस संधी देण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळातील 18 जागांपैकी 17 जागांसाठी नावे रुहानी यांनी जाहीर केली. या मंत्र्यांना येत्या आठवड्यामध्ये इराणी संसदेची मान्यता मिऴणे आवश्यक आहे. 19 मे रोजी झालेल्या 12 व्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रुहानी यांना 57 टक्के मतदान झाले आणि त्यांना सलग दुसऱ्यांना सत्तेमध्ये येता आले.
रुहानी यांनी केलेल्या मंत्रिमंडळाच्या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे बिजान नामदक झांगरेह यांना पुन्हा पेट्रोलियम खाते मिळाले आहे. इस्लामिक क्रांती झाल्यापासून 32 वर्षे झांगरेह यांना मंत्रीपदावर राहता आले. 2013 पासून त्यांच्याकडे पेट्रोलियम खात्याची सलग जबाबदारी आहे. संपुर्ण पर्शियन आखातामध्ये सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक देश असा सन्मान इराणला मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते.
झांगरेह यांच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या पहिल्या दोन टर्ममध्ये म्हणजे 1997 ते 2005 या काळामध्ये त्यांनी टोटल आणि रॉयल डच शेल कंपनीसह अनेक तेल कंपन्यांना इराणमधील नैसर्गिक वायू क्षेत्राची वृद्धी करण्यासाठी आमंत्रण दिले. 2013 साली ते पुन्हा पेट्रोलियम मंत्री झाल्यानंतर तेलनिर्यात आणि उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. 2016 साली या क्षेत्राला आर्थिक मदत मिळाल्यानंतर इराणचे तेल उत्पादन प्रतिदिन 10 लाख बॅरल्स इतके झाले. त्यांनी टोटल कंपनीबरोबर केलेला करार हा इराणच्या तेलउत्पादनामध्ये मैलाचा दगड मानला जातो.
झांगरेह यांचा जन्म 22 जून 1952 रोजी करमनशाह येथे झाला. तेहरान विद्यापिठामध्ये त्यांनी स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेतले. 1979 साली इस्लामिक क्रांती झाल्यावर पुढच्याचवर्षी सांस्कृतीक खात्याचे उपमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे विविध खात्यांची जबाबदारी देण्यात आली. पेट्रोलियम खात्यातील त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. झांगरेह यांनी विविध विद्यापिठांमध्ये अध्यापनही केले आहे. झांगरेह यांच्याप्रमाणे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद अरिफ यांनाही पुन्हा तेच खाते मिळाले आहे,