झिम्बाब्वेमध्ये लष्करी उठावाची चिन्हे, 9400 भारतीय सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 04:07 PM2017-11-15T16:07:04+5:302017-11-15T16:13:16+5:30
झिम्बाब्वेमध्ये कामनिमित्ताने 400 भारतीय वास्तव्यास असून भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या 9 हजार आहे.
हरारे - झिम्बाब्वेमध्ये राहणारे सर्व भारतीय सुरक्षित असून इथे परिस्थिती सामान्य आहे अशी माहिती हरारेमधील भारतीय राजदूत आर. मासाकुई यांनी दिली. झिम्बाब्वेमध्ये लष्कराने शासकीय दूरचित्रवाहिनी झेडबीसीचा ताबा घेतला असून तिथे लष्करी उठाव होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हरारेमधील भारतीय राजदूताने सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती दिली. झिम्बाब्वेमध्ये कामनिमित्ताने 400 भारतीय वास्तव्यास असून भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या 9 हजार आहे.
झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या भोवतालच्या गुन्हेगारांविरोधात ही मोहिम उघडण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. रॉबर्ट मुगाबे यांची चार दशकांपासून झिम्बाब्वेवर असलेली मजबूत पकड संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहे. मुगांबे आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
इथे राहणारे सर्व भारतीय सुरक्षित आहेत. वाहिन्यांवरील तुम्ही दृश्ये पाहिली तर सर्वकाही शांत, सुरळीतपणे सुरु असल्याचे तुमच्या लक्षात येईल. सर्व कार्यालये सुरु आहेत. मी माझ्या कार्यालयात आहे असे आर. मासाकुई यांनी सांगितले. रॉयटर्स वृत्तसंस्थेला सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री इग्नॅशियस चोंबो यांना ताब्यात घेण्यात आले आहे.या लष्करी कारवाईचे नेतृत्त्व कोणाच्या हातामध्ये आहे हे देखिल अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बुधवारी राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या घराजवळील बोरोडाल या उपनगरामध्ये गोळीबार झाल्याची माहिती वृत्तसंस्थेला मिळालेली आहे. गेल्या आठवड्यात मुगाबे यांनी उपराष्ट्रपती इमर्सन मनागाग्वा यांना पदच्युत केले होते. इमर्सन हे मुगाबे यांचे राजकीय वारस मानले जात होते. मात्र नंतर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबेचे नाव या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ लागले. त्यामुळे ग्रेस मुगाबे आणि इमर्सन यांचे दोन गट सत्ताधारी झानू पीएफ पक्षात तयार झाले आणि तणावाला सुरुवात झाली.