लैंगिक संबंधातून अमेरिकेत आला झिका व्हायरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2016 09:57 AM2016-02-03T09:57:16+5:302016-02-03T09:57:16+5:30
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३ - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. डास चावल्यामुळे रुग्णाला झिका व्हायरसची लागण झालेली नसून, लैंगिक संबंधातून झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती टेक्सासच्या स्थानिक आरोग्य अधिका-यांनी दिली.
झिका व्हायरसचा गंभीर धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आधीच आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमरजन्सी जाहीर केली आहे. झिका व्हायरसने बाधित असलेला संबंधित रुग्ण वेनेझुएला इथे गेला होता तिथून लैंगिक संबंधातून या रोगाची लागण झाली. या रुग्णाने दक्षिण अमेरिकन देशांमध्ये प्रवास केलेला नाही अशी माहिती अमेरिकन आरोग्य अधिका-यांनी दिली.
टेक्सासमध्ये डासांच्या चावण्यामधून हा रोग आलेला नाही असे अधिका-यांनी सांगितले. गर्भवती स्त्रियांना सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण झिका व्हायरसमुळे गर्भात असलेल्या मुलाच्या मेंदूवर परिणाम होते. झिका व्हायरसमुळे ब्राझीलमध्ये ऑक्टोंबरपासून अनेक सदोष मुले जन्माला आली आहेत. लॅटिन अमेरिकेत हा रोग वेगाने पसरत असून, अफ्रिका आणि आशिया खंडालाही या आजारापासून धोका आहे.