झिंगाडा आमचाच! कुख्यात गँगस्टरसाठी पाकिस्तानची भारताविरोधात न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 10:08 AM2018-10-06T10:08:02+5:302018-10-06T10:09:13+5:30
छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
बँकॉक - छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. मुदस्सर हुसेन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा हा पाकिस्तानचा नागरिक असून, त्याला आपल्याच ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने थायलंडमधील न्यायालयात केली आहे. काही महिन्यांपूर्वी याच न्यायालयाने मुन्ना झिंगाडाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते.
झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत त्याला भारताकडे सोपविण्याचे आदेश थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिले होते. झिंगाडा याला थायलंडमध्ये छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी थायलंड पोलिसांनी अटक केली होती. झिंगाडाला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारतीय तपास यंत्रणांनी केली होती. मात्र, पाकिस्तानने झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगत त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.
जानेवारी महिन्यात भारतीय पोलिसांचे एक पथक थायलंडला गेले होते. त्या पथकाने झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर केले होते. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले असून त्याला भारताकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.