अमेरिकन काँग्रेसपुढे झुकरबर्गची दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:43 AM2018-04-11T05:43:54+5:302018-04-11T05:43:54+5:30
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली.
वॉशिंग्टन : केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली.
झुकरबर्ग यांची काँग्रेससमोर प्रथमच साक्ष झाली. सोमवारी ती प्रसिद्ध करण्यात आली. तीत त्यांनी ८७ दशलक्ष वापरकर्त्यांच्या खासगी माहितीला सुरक्षित ठेवण्यात आणि फेसबुकचा गैरवापर रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी स्वीकारली. आमच्या जबाबदारीची व्यापक भूमिका काय हे आम्ही समजून घेतले नाही व ती मोठी चूक होती. ती माझी चूक होती, मी दिलगीर आहे,’ असे झुकरबर्ग यांनी लेखी साक्षीत म्हटले. निवडणुकीत विदेशांचा हस्तक्षेप झाला व द्वेषाच्या भाषणातही वापर झाला, असे झुकरबर्ग म्हणाले.
झुकरबर्ग सध्या व्यावसायिक पातळीवर सगळ््यात वाईट संकटाला तोंड देत आहेत. त्यांची साक्ष बुधवारी सभागृह समितीसमोर होईल. फेसबुकच्या लक्षावधी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाकडून गैरवापर झाल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. झुकरबर्ग यांनी मीसुद्धा आदर्शवादी होतो व दोन अब्ज लोक जे माध्यम वापरतात त्याचा कसा गैरवापर व लबाडीसाठी केला जाऊ शकतो याचे आकलन होऊ शकले नाही, असे म्हटले आहे.
>फेसबुकवर घडेल त्याला मी जबाबदार
‘मी फेसबुक सुरू केले. ते मी चालवतो आणि येथे जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे. त्या माहितीचा गैरवापर न होण्यासाठी आम्ही पुरेसे काही केले नाही हे तर स्पष्टच आहे. त्याचा खोट्या बातम्यांसाठी वापर झाला, असेही झुकरबर्ग म्हणाले़