दुकान फोडून 1 कोटी 70 लाखांची रक्कम लंपास, चोरट्यांनी CCTVचा डीव्हीआरही नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:27 PM2022-12-26T20:27:30+5:302022-12-26T20:27:40+5:30
जालन्यातील जुना मोंढा परिसरात घडली घटना.
जालना: दुकानातील तिजोरीत ठेवलेली जवळपास १ कोटी ७० लाख १ हजार ७५ रूपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जालना शहरातील जुना मोंढा येथील नथ्थुमल कापड दुकानात रविवारी रात्री घडली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
महेश नथ्थुमल नाथानी यांचे जुना मोंढा भागात नथ्थुमल होलसेल या नावाचे कापड दुकान आहे. शनिवारी आणि रविवारी बॅंकेला सुटी असल्यामुळे त्यांनी कापड विक्रीतून आलेली रक्कम दुकानातील तिजोरीतच ठेवली होती. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेली १ कोटी ७० लाख १ हजार ७५ रूपयांची रक्कम लंपास केली. सोमवारी सकाळी महेश नाथानी हे दुकानात आले असता, त्यांना चोरी झाल्याचे कळाले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली.
ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता, चोरट्यांनी डीव्हीआरही चोरून नेला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, महेश नाथानी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ हे करीत आहेत.