दहा दिवसांत ६०० कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:57 IST2020-03-08T23:56:22+5:302020-03-08T23:57:09+5:30
महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे

दहा दिवसांत ६०० कोटी जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, तर आधार प्रमाणीकरण केलेल्या ८८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर गत दहा दिवसांत तब्बल ६१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतक-यांना १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक यादी जाहीर झाली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ कर्जखात्यांचा समावेश होता. तर २९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश होता. याद्यांच्या प्रसिध्दीकरणानंतर आजवर ९९ हजार ९२६ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर तब्बल ८८ हजारावर शेतक-यांच्या कर्जखात्यात ६१५ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत ७४ हजार ४५९ कर्जखात्यावर ५८१ कोटी तर जिल्हा बँकेच्या जवळपास १४ हजार कर्जखात्यांवर जवळपास ३४ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कमही जमा केली जाणार आहे.
जिल्ह्यातून १५०० तक्रारी
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाबाबत १५०० जणांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. यात आधार क्रमांक चुकीचा असणे, ठसे न उमटणे, मयत शेतक-यांचे वारस आदी तक्रारींचा समावेश आहे.
मयतांच्या वारसांनी माहिती देण्याची गरज
ज्या शेतक-यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे नाव कर्जमुक्ती यादीत आहे, अशा मयत शेतक-यांच्या वारसांनी संबंधित बँक अधिकारी किंवा तहसीलदारांकडे माहिती देण्याची गरज आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरेल. माहिती भरल्यानंतर त्या कर्जखात्याला कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.
४० हजार खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लक
शासनाच्या दोन याद्यांमधील शेतक-यांपैकी ९९ हजार ९२६ शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर जवळपास ३० हजार शेतक-यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.
संबंधित शेतक-यांनी हे आधार प्रमाणिकरण वेळेत करून घ्यावे. बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात असलेल्यांना आपलं सरकार केंद्रावरूनही आधार प्रमाणिकरण करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.