३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:29 AM2019-12-16T00:29:47+5:302019-12-16T00:30:17+5:30
जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघाविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना जालना शहरातील एका घरात अवैधरित्या विक्रीसाठी गांजाचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर भागातील भारत रतन पवार याच्या घरावर शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी तहसीलदार श्रीकांत भूजबळ यांच्यासह पंचही उपस्थित होते. या घरामध्ये तब्बल ३५ लाख ३८ हजार रूपये किंमतीचा ७१ किलो गांजा आढळून आला. यावेळी भारत रतन पवार (३० रा. संजय नगर, जुना जालना), दीपक भिमराव हिवाळे (२३ रा. गोलापांगरी ता. जालना) व एक महिला आढळून आली. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द कदीम ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार राजमाने, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पोना प्रशांत देशमुख, रंजित वैराळे, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, पोकॉ सचिन चौधरी, महिला पोना मंदा बनसोडे, चालक पोकॉ धम्मदिप सुरडकर आदींच्या पथकाने केली.
इतर साहित्यही जप्त
गांजा मोजून पॅकिंग करण्यासाठी असलेला लोखंडी तराजू, माप, वजन, गांजा भरण्यासाठी लागणा-या प्लॅस्टिक पिशव्याही या कारवाईवेळी जप्त करण्यात आल्या आहेत.
संबंधितांनी साठा केलेल्या गांजाची प्लॅस्टिक पन्नीमध्ये अर्धा किलो प्रमाणे पॅकिंग सुरू होती. अर्धा किलो वजनाचे हे पॉकेट अवैधरीत्या बाजारात विक्री करण्यासाठी संबंधितांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव उधळला.
स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेला ७१ किलो गांजा कदीम पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षाकडे देण्यात आला आहे. कदीम पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला असून, गांजा कोठून आणण्यात आला? याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १० वाजण्याच्या सुमारास भारत पवार याच्या घरावर धाड मारली. घटनास्थळी आढळून आलेला गांजा व इतर साहित्य ताब्यात घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल चार तास तळ ठोकून होते.