हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर, फोनपेद्वारे १ लाख रुपये काढले
By दिपक ढोले | Published: August 29, 2023 05:42 PM2023-08-29T17:42:18+5:302023-08-29T17:43:02+5:30
सायबर पोलिसांमुळे २५ हजार परत मिळाले, उरलेली रक्कम गोठविण्यात आली आहे
जालना : हरवलेल्या मोबाइलचा गैरवापर करून फोनपेद्वारे १ लाख रुपये काढून घेतले. याची माहिती सायबर पोलिसांना देताच, पोलिसांनी तत्काळ २५ हजार रुपये रिफंड केले तर ७४ हजार रुपये गोठविले आहेत. ही कारवाई सायबर पोलिसांनी मंगळवारी केली आहे.
२४ ऑगस्ट रोजी फिर्यादी हा शहरातील अंबड चौफुली येथून रिक्षाने रेल्वेस्थानकाकडे जात होता. त्याचवेळी त्यांचा मोबाइल हरवला. तो मोबाइल त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्याशी लिंक होता. मोबाइलमध्ये फोन पे सुरू होते. त्यांच्या खात्यात जवळपास १ लाख १५ हजार रुपये होते. फोनपेच्या खात्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी फिर्यादीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. पोलिसांनी बॅंकेशी संवाद साधला असता, फिर्यादीच्या खात्यातून १ लाख रुपये विथड्रॉल झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर २५ हजार रुपये रिफंड केले. तर उर्वरित ७४ हजार रुपये गोठविण्यात आले आहेत.
चार मोबाइलचा घेतला शोध
सायबर पोलिसांनी संचार साथी पोर्टलच्या मदतीने चोरीस गेलेल्या चार मोबाइलचा शोध घेतला आहे. या मोबाइलची किंमत जवळपास १ लाख २ हजार रुपये आहे. ते फिर्यादींना परत देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, सफौ. पाटोळे, राठोड, मांटे, पोशि. भंवर, पालवे, नागरे, दुनगहू यांनी केली आहे.