एक हजार बालकांमागे १० बालकांना जन्मताच हृदयाच्या आजाराची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:47 PM2024-07-05T19:47:31+5:302024-07-05T19:48:01+5:30

विविध कॅम्पच्या माध्यमातून तीन वर्षात ७८७ पेक्षा अधिक बालकांच्या हृदयाची तपासणी

10 out of 1,000 babies have heart problems at birth | एक हजार बालकांमागे १० बालकांना जन्मताच हृदयाच्या आजाराची समस्या

एक हजार बालकांमागे १० बालकांना जन्मताच हृदयाच्या आजाराची समस्या

-शिवचरण वावळे
जालना :
नवजात बालकाच्या हृदयास जन्मताच छिद्र असणे हे बहुतेक वेळा नैसर्गिक असल्याचे मानले जाते. यासाठी कुठलेही ठोस असे कारण नसले तरी, तज्ज्ञ डाॅक्टरांच्या अहवालानुसार गर्भवती महिलेस पहिल्या काही महिन्यात रुबेला आजार, विषाणूजन्य आजाराची लागण, अनियंत्रित मधुमेह किंवा महिला कुपोषित असणे याचा कमी-अधिक परिणाम जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर होतो. अर्थात बाळास हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जिल्हा आरोग्य विभागास मागील तीन वर्षात हृदयाला छिद्र असलेल्या १२० नवजात बालकांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.

जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप (इंटरव्हेन्शन) केंद्राच्या मदतीने मागील तीन वर्षात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून जिल्हाभरातील ७८७ बालकांची हृदयाशी संबंधित आजाराची तपासणी करण्यात आली. यामध्ये हृयाला छिद्र असलेल्या १२० पेक्षा अधिक बालके आढळून आली. त्या बालकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही बालकांची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असल्याने पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जन्माला येणाऱ्या एक हजार बालकांमागे ९ ते १० बालकांना हृदयासंबंधी समस्या असतात. त्यामुळे जन्मलेल्या बाळाची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. त्यामुळे इंटरव्हेन्शन सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून आठवड्यातून दोन तीन दिवस जिल्हा रूग्णालयातील एसएनसीयू वार्डात उपचार घेत असलेल्या बाळांची तपासणी केली जाते.

मागील तीन वर्षातील शस्त्रक्रियेची आकडेवारी

- २०२१-२२, ३६
- २०२२-२३, ३८
- २०२३-२४, ४६
एकूण १२० शस्त्रक्रिया

इतर शस्त्रक्रिया केलेल्या नवजात बालकांची संख्या
२०२१-२२, २२
२०२२-२३ , ४२
२०२३-२४, १२८
एकूण - १९२

लवकरात लवकर उपचार करावेत
जन्मजात बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. अनेक पालकांच्या खिशाला हा खर्च परवडत नाही. त्यामुळे शासनाकडून त्यांना अर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे बाळाचे वय कमी असताना शस्त्रक्रिया केल्यास भविष्यातील हृदयाची होणारी गुंतागुंत वाढण्यापासून रोखता येऊ शकते. त्यामुळे पालकांनी बालाच्या हृदयाच्या छिद्राकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना सहकार्य करून बाळावर उपचार करून घ्यावेत.
- डॉ. मीनल देवळे, विभाग प्रमुख, इंटरव्हेन्शन सेंटर, जालना.

Web Title: 10 out of 1,000 babies have heart problems at birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.