गांजा बाळगणाऱ्या तिघांना दहा वर्षांचा सश्रम कारावास
By विजय मुंडे | Published: June 1, 2024 07:41 PM2024-06-01T19:41:23+5:302024-06-01T19:41:26+5:30
जालना जिल्हा न्यायालयाचा निकाल, प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला
जालना : अवैधरीत्या गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर जैस्वाल यांनी शनिवारी दहा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
महादेव जालिंदर हरकळ (वय २८, रा. दिंद्रूड, ता. माजलगाव, जि. बीड), इक्बाल अहमद शफी अहमद (३८, रा. नूतन वसाहत जालना), गणेश संपत्ती मेंढके (३४, रा. दिंद्रूड, ता. माजलगाव, जि. बीड) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जालना येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोउपनि. राहुल पाटील, स्थागुशाचे पोनि. सुभाष भुजंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी रेवगावकडून जालन्याकडे येणाऱ्या कारची (क्र.एम.एच.१४-सी.एक्स. ९२९९) तपासणी केली होती. त्यावेळी कारमधील ६३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला होता. या प्रकरणात पोलिस हवालदार राजेश घुगे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध कलम २० एन.डी.पी.एस. ॲक्ट (अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अशोक मते यांनी काम पाहिले. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश -तीन किशोर जैस्वाल यांनी महादेव जालिंदर हरकरळ, इक्बाल अहमद शफी अहमद व गणेश संपत्ती मेंढके यांना कलम २० एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे ॲड. अशोक मते यांनी सांगितले.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात हवालदार राजेश गैबी, पांडुरंग बोरूडकर, पोउपनि. राहुल पाटील, पोकॉ. संदीप टेकाळे, पोनि. एम. बी. जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली.