मंदिराच्या विश्वस्ताकडून १० हजाराची लाच; धर्मादाय कार्यालयातील निरीक्षक एसीबीच्या ताब्यात
By विजय मुंडे | Published: May 23, 2023 06:25 PM2023-05-23T18:25:47+5:302023-05-23T18:26:17+5:30
जालना येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय परिसरात एसीबीचा सापळा
जालना : एका मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या जालना येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकावर लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय परिसरात करण्यात आली.
धरमसिंग भाऊसिंग जंघाळे (वय-४५) असे कारवाई झालेल्या निरीक्षकाचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट फेरफार करण्यासाठी जालना येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात रितसर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. परंतु, निरीक्षक धरमसिंग जंघाळे यांनी २० हजार रूपये लाचेची मागणी केली. याप्रकरणात १७ मे रोजी जालना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तात्काळ पथकाने तक्रारीनुसार पडताळणी केली.
तक्रारीच्या पडताळणीनंतर एसबीच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दुपारी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराच्या कामासाठी निरीक्षक धरमसिंग जंघाळे याने २० हजार रूपये लाचेची मागणी केली. प्रारंभी १० हजार रूपये व काम झाल्यानंतर १० हजार रूपये देण्याची मागणी करीत १० हजार रूपये स्वीकारल्यानंतर पथकाने कारवाई केली. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक किरण बिडवे, पोनि. शंकर मुटेकर, ज्ञानदेव जुंबड, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गजानन कांबळे, गणेश चेके यांच्या पथकाने केली.