१०८ जणांचा डेंग्यू तापाचा पॉझिटिव्ह अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:57 AM2018-12-21T00:57:55+5:302018-12-21T00:58:23+5:30
जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे यावर्षी जिल्हाभरातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात डेंग्यू तापाचा तब्बल १०८ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आढळून आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे यावर्षी जिल्हाभरातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात डेंग्यू तापाचा तब्बल १०८ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आढळून आला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी घरच्या परिसरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाभरात नियमित मलेरिया, डेंगु व हिवताप संशयित रूग्णांची तपासणी केली जाते. यात यंदा ४२३ डेंगु सदृश्य नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्याचे रक्ताचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात वर्षभरात तब्बल १०८ जणांना डेंगीचा ताप असल्याचे समोर आले. तसेच १ लाख २२ हजार संशयित हिवताप रूग्णांची तपासणी करण्यात आली असता यात १ रूग्ण हिवतापीचा आढळून आला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलीे.
हिवताप व डेंगी तापाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी आठवड्यातून दोन वेळेस घरातील पाण्याचे रांजण, हौद, टाक्या रिकामे करून कपड्याने पुसून कोरडे करून मगच पाणी भरावे. सांड- पाण्याच्या नाल्या वाहत्या करून घेणे व शोष खड्डे तयार करून त्यातच सांडपाणी सोडणे. जुने टायर, डब्बे, नारळाच्या करवंट्या, तुळशीपात्र, कुलर इ. मध्ये पाणी साठू नये, किंवा यांची तात्काळ विल्हेवाट लावावी.
रुग्णालयाशी संपर्क साधा
तुंबलेली गटारे किंवा नाले यावर रॉकेल टाकावे, तसेच तापाचा रूग्ण आढळून आल्यास तात्काळ आरोग्य कर्मचारी किंवा शासकीय रूग्णालयात संपर्क साधून रोगनिदान करून उपचार घ्यावा, असेही आवाहन जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक विजय सिंह शिंदे व महेंद्र वाघमारे यांनी केले आहे.