दुष्काळात तेरावा; ११ एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:59 AM2019-01-20T00:59:00+5:302019-01-20T00:59:22+5:30
अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शनिवारी दुपारी वीज तारांचे शॉर्ट सर्किट होवून उसाला आग लागली. यात शहागड येथील तीन शेतकऱ्यांचा ११ एक्कर ऊस जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शनिवारी दुपारी वीज तारांचे शॉर्ट सर्किट होवून उसाला आग लागली. यात शहागड येथील तीन शेतकऱ्यांचा ११ एक्कर ऊस जळाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ११ के. व्ही. च्या उच्च दाबाच्या तारांचे घर्षण होवून ही आग लागली असल्याची माहिती शेतक-यांनी दिली आहे.
बाबासाहेब भोसले यांची शहागड शिवारात गट क्र. ५९ मधिल साडेपाच एक्कर ऊस, रमेश भोसले यांचा एक हेक्टर तसेच कुसूम भोसले (सर्व रा. शहागड) यांचा साडेतीन एकर असा एकूण ११ एक्कर मधिल ऊस या आगीत खाक झाला आहे.
आग लागल्याचे शेतक-यांच्या लक्षात येताच त्यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळात अग्निशाम दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामुळे ही आग आटोक्यात आली अन्यथा शेजा-यांच्या उसाला आग लागून मोठी घटना घडली असती.
उसामधील विजेच्या तारेची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणला कल्पना दिली होती. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने ही आग लागली असल्याचे नागरिकांचे मत आहे. एक तर यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतक-यांनी कसा- बसा ऊस जगविला होता.
आगीच्या घटना वाढल्या : कारखान्याने ऊस तोडण्याची मागणी
येथील परिसरात मोठ्या प्रमणात ऊस असून गेल्या काही दिवसांपासून येथे आगीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे तातडीने कारखान्याने ऊस नेण्याची मागणी होत आहे.
येथील परिसरात वीज तारा खाली आल्या आहेत. यामुळे महावितरणने वीज तारांची दुरूस्ती करण्याची मागणी शेतक-यांनी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली.