११ दिवसांची ओळख, सोन्याची नाणी खरेदीचा मोह अन् नऊ लाखांना चुना

By विजय मुंडे  | Published: May 21, 2023 08:17 PM2023-05-21T20:17:05+5:302023-05-21T20:17:37+5:30

भोकरदन शहरातील घटना, पाेलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

11 days introduction, temptation to buy gold coins and lime for nine lakhs | ११ दिवसांची ओळख, सोन्याची नाणी खरेदीचा मोह अन् नऊ लाखांना चुना

११ दिवसांची ओळख, सोन्याची नाणी खरेदीचा मोह अन् नऊ लाखांना चुना

googlenewsNext

भोकरदन : ११ दिवसांपूर्वीच ओळख झालेल्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवणे भोकरदन शहरातील शेतकऱ्याला चांगलेच भोवले आहे. त्या व्यक्तीच्या पाहुण्याला सापडलेली २६० ग्रॅम सोन्याची नाणी शेतकऱ्याने नऊ लाख रुपयांना १८ मे रोजी खरेदी केली; परंतु सोनाराने ती नाणी बनावट असल्याचे समजताच शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली असून, या प्रकरणात भाेकरदन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदन शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे शेतकरी गजानन रामकिसन सहाने यांची जालना येथे ७ मे रोजी एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्या व्यक्तीने त्यावेळी त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला होता. त्या व्यक्तीने १० मे रोजी सहाने यांना फोन करून पाहुण्याला सोन्याची नाणी सापडली आहेत. ती विक्री करायची आहेत तुम्ही खरेदी करता का, अशी विचारणा केली. सहाने यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने तुमच्या मध्यस्तीने नाण्यांची विक्री करून द्या, असे सांगितले. त्यानंतर १६ मे रोजी त्या व्यक्तीने सोन्याच्या नाण्याचे सॅम्पल पाहण्यासाठी सहाने यांना बोलावून घेतले. त्याने त्याच्याकडील एक ग्रामची दोन नाणी सहाने यांना दिली. सहाणे यांनी ती नाणी सोनाराकडे तपासल्यानंतर सोनाराने ती नाणी खरी असल्याचे सांगितले. १७ मे राजी सहाने यांनी पैशांची जुळवाजुळव करून त्या व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीने १८ मे राेजी त्यांना सिंदखेडराजा येथे बोलाविले. सहाने व त्यांचा वाहन चालक हे दोघे १८ मे रोजी सिंदखेड राजा येथे गेले. त्या व्यक्तीसमवेत चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा भोकरदन शहराकडे आले. 

नांजा पाटीवर त्या व्यक्तीने पन्नीतील नाणी सहाने यांच्याकडे देऊन नऊ लाख रुपये घेतले. घेतलेले पैसे पाहुण्याला देऊन येतो. नंतर सोनाराच्या दुकानात जाऊ, असे सांगत तो निघून गेला; परंतु तो परत न आल्याने सहाने यांनी सोन्याच्या नाण्यांची तपासणी केली. त्यावेळी ती नाणी बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणात गजानन सहाने यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् मोबाइल केला बंद
सहाने यांच्याकडून पैसे घेऊन गेलेला तो व्यक्ती अर्ध्या तासानंतरही परत आला नाही. त्यामुळे सहाने यांनी त्याला फोन केला; परंतु त्याचा फोनही बंद होता. फोन बंद असल्याने सहाने यांना शंका आली आणि त्यांनी सोनाराचे दुकान गाठून नाण्यांची तपासणी केली. सोनाराने ती नाणी बनावट असल्याचे सांगताच सहाने यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: 11 days introduction, temptation to buy gold coins and lime for nine lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.