भोकरदन तालुक्यातील ११० कूपनलिका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:40+5:302021-05-01T04:28:40+5:30
भोकरदन : ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी भोकरदन शहरासह तालुक्यातील १५७ गावांमध्ये कूपनलिका घेण्यात आल्या होत्या. ...
भोकरदन : ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी भोकरदन शहरासह तालुक्यातील १५७ गावांमध्ये कूपनलिका घेण्यात आल्या होत्या. परंतु, मागील काही दिवसांपासून ७४७ पैकी ११० कूपनलिका बंद आहेत. यामुळे आता या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.
तालुक्यात सतत दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दुष्काळात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी भोकरदन शहरासह १५७ गावांत ठिकठिकाणी कूपनलिका घेण्यात आल्या. बहुतांश कूपनलिकांना पाणीदेखील लागले आहे. परंतु, भोकरदन तालुक्यातील ७४७ कूपनलिकांपैकी तब्बल ११० कूपनलिका बंद आहेत, तर भोकरदन शहरात १४० कूपनलिका आहेत. त्यापैकी ४८ कूपनलिका बंद आहेत. काही कूपनलिका खासगी व्यक्तींनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तर ग्रामीण भागातील कूपनलिकांचे पाईप चोरीला गेले आहेत. सध्या कडाक्याचे ऊन पडत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सात ते आठ किलोमीटरवरून ग्रामस्थांना पाणी आणवे लागत आहे.
१३ योजनांद्वारे पाणी पुरवठा सुरळीत
१३ पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर तालुक्यातील १२४ ग्रामपंचायतींमध्ये १२४ पाणी पुरवठा योजना सुरू असून, सर्व योजनांतून पाणी पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पाकळ यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात तालुक्यात चांगला पाऊस झाला असल्याने सर्व योजना व्यवस्थित सुरू असून, पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे. तसेच १३ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.