जालना जिल्ह्यात ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:32 AM2018-08-23T00:32:54+5:302018-08-23T00:33:09+5:30
जिल्ह्यात तब्बल ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’ असून ते आजही खुलेआम फिरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी अद्यापही ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेले नाही. आजही जिल्ह्यात तब्बल ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’ असून ते आजही खुलेआम फिरत आहेत. त्यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चोरी, दरोडे, घरफोडीसह लुटमारीच्या घटना मागील काही दिवसांत जास्त घडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर गुन्ह्यांसह मारामारी, धमकी यासारख्या गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे. असे असले तरी यातील आरोपींना शोधून गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यासाठी जालना पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विशेष पथकांचीही नियुक्ती केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यातील सर्व फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.