१२ लाख २६ हजार रुपयांचे वाळूसाठे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:26 AM2019-06-27T00:26:52+5:302019-06-27T00:27:06+5:30
अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाने अचानक छापे मारून १२ लाख २६ हजार रूपयांचे वाळू साठे जप्त केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाने अचानक छापे मारून १२ लाख २६ हजार रूपयांचे वाळू साठे जप्त केले आहेत.
तालुक्यातील पूर्णा, गिरिजा, केळना, जुई इ. नद्यांमधून सर्रास अवैध वाळू उपसा करण्यात येत असून या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना या बाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यामुळे तहसीलदार संतोष गोरड यांनी मंगळवारी नायब तहसीलदार व्ही. आर. धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुनील दळवी, अनिल वानखेडे, किशोर खंदारे, कल्याण माने यांचे पथक नेमून धडक कारवाई केली.
या पथकाने मेरखेडा शिवारातील पूर्णा नदी पत्रातील ५० ब्रास वाळू साठा जप्त केला. त्याच बरोबर सिरजगाव वाघ्रळ येथील गट क्रमांक ३५२ या शासकीय गायरानात साठविलेला ५०० ब्रास वाळू साठा जप्त केला. त्यानंतर या पथकाने खापरखेडा येथील शासकीय गायरानात साठा केलेला २४० ब्रास वाळू साठा जप्त केला. यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले. परंतु ही प्रक्रिया थांबताना दिसत नसल्याने पुन्हा प्रशासन कामाला लागल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील वाळू माफियांनी शक्कल लढवून अवैध वाळूचा साठा करण्यासाठी बहुतांश ठिकाणी शासकीय गायरानाचा वापर केला आहे. जेणे करून आपले नाव त्यामध्ये येणार नाही, झालेच नुकसान तर वाळूच जाईल, मात्र थेट कारवाई होणार नाही, अशी यामागची युक्ती आहे.
महसूलचे अधिकारी सुध्दा वाळूसाठा कोणाच्या खाजगी जागेत नसल्यामुळे धडक कोणावर कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे वाळू माफियांनी अवैध वाळूसाठा करण्यासाठी शासनाचेच गायरान निवडल्याचे दिसत आहे.