१३ लाख रूपयांचा वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:03 AM2018-08-21T01:03:56+5:302018-08-21T01:04:42+5:30
तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.
भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार योगिता कोल्हे यांनी पथक नेमून अवैध वाळू साठ्यावर छापे मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी एमक़े़ ठोंबरे, तलाठी के.एसख़ंदारे, एस़पीक़दम, एम़जी. शिदे, बी़एस़ खरात यांनी सोमवारी रोजी खडकी ते जवखेडा या रस्त्यावरील १० वाळू साठ्यावर छापे मारून हा वाळूसाठा जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
तहसीलदारांच्या पथकाने वाळू साठ्यावर कारवाई केल्यामुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदरील जप्त करण्यात आलेले वाळूसाठे कोणाच्या मालकीचे आहेत हे आद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी हे वाळूसाठे चक्क शासकीय गायरान जमिनीवर साठविण्यात येत असल्यामुळे याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. अशीच कारवाई ही पुढेही चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.