पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:49+5:302021-01-21T04:28:49+5:30

पशुधन वाऱ्यावर : रिक्त पदांकडे लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष विजय मुंडे जालना : जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला ...

131 posts vacant in Animal Husbandry Department | पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त

पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त

Next

पशुधन वाऱ्यावर : रिक्त पदांकडे लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

विजय मुंडे

जालना : जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला मात्र रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत व राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील जिल्ह्यातील एक दोन, नव्हे तब्बल १३१ पदे रिक्त आहेत. विशेषत: जिल्हा पशुचिकित्सालयाचे कामकाज दोघांच्या खांद्यावर पडले आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे; तर जालना जिल्ह्यातील तीन गावांमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी ‘लम्पी स्कीन’ या आजाराने पशुपालक, शेतकऱ्यांची झोप उडाली होती. जिल्ह्यातील पशुधनावर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यात १०४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. यात जिल्हा परिषदेंतर्गत ५९, तर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची ४५ रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असून, अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचाही वानवा आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकाऱ्यांची ४२ पदे मंजूर असून, त्यातील २० पदे भरलेली आहेत; तर तब्बल २२ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १० पदे मंजूर असून, त्यातील तीन पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या ४७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत, तर वर्णेापचारकांच्या २७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.

राज्य पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांसह पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी एकूण १३९ पदे मंजूर असून, त्यातील केवळ ४९ पदे भरण्यात आली आहेत, तर तब्बल ९० पदे रिक्त आहेत. विशेषत: जालना शहरातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात केवळ सहायक आयुक्त व इतर एक अशी दोनच पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १३ पदे रिक्त आहेत. तर एकूण पदांमध्ये सहायक आयुक्तांची ४, पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे १, पशुधन पर्यवेक्षकांची २५, लघुलेखक १, वरिष्ठ सहायक १, वरिष्ठ लिपिक ५, कनिष्ठ लिपिक १, चालक- २, वर्णेापचारक ४, शिपायाचे एक, परिचराचे ३८, रात्रपहारेकऱ्याचे १, स्वच्छकाचे १ अशी ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शहरी विशेषत: ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जनावरे आजारी पडली किंवा एखादी साथ आली, तर वेळप्रसंगी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

अस्मानी-सुल्तानी संकटांच्या काळात दुधाळ जनावरांमुळे शेतकरी, पशुपालकांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो. शेतकऱ्यांनी पशुधनाचा जोड व्यवसाय करावा, यासाठी शासन विविध योजनाही राबवित आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पशुधन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.

वरिष्ठांकडे अहवाल

जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयातून उपचार दिले जात असून, साथ नियंत्रणासह लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

डॉ. डी.एस. कांबळे

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

Web Title: 131 posts vacant in Animal Husbandry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.