वर्षभरातच जाफराबाद नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची तयारी; १४ नगरसेवक सहलीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 04:26 PM2023-02-25T16:26:46+5:302023-02-25T16:30:40+5:30
सत्तेच्या सारिपाटात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता मिळविली अन् नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने विराजमान झाल्या.
- प्रकाश मिरगे
जाफराबाद ( जालना) : निवडणुका होऊन एक वर्ष होत नाही तोच जाफराबाद नगरपंचायतीमध्ये सत्ता बदलासाठी खलबते सुरू झाली आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतराच्या धर्तीवर जाफराबादमध्येही फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मदतीने मिळवलेली सत्ता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सध्या भाजपचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार आणि काँग्रेसचे संपूर्ण सहा असे एकूण १४ नगरसेवक सहलीवर गेले असून, नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात होऊ लागली आहे.
जाफराबाद नगर पंचायतीच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाले आहे. नगर पंचायती निवडणुकीत १७ जागांपैकी राष्ट्रवादीच्या ६ अधिकृत व एका राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाला होता, तर काँग्रेसने सहा जागा खेचल्या होत्या. भाजपला चार जागांवर विजय मिळवता आला होता. सत्तेच्या सारिपाटात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता मिळविली अन् नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने विराजमान झाल्या.
सत्ता स्थापनेच्या एका वर्षातच १७ पैकी राष्ट्रवादीच्या ४, काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सहयोगी सदस्य सोडल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सदस्य संख्या सारखी आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. या घडामोडीला आणि दाखल होणाऱ्या अविश्वास प्रस्तावास भाजपची साथ असल्याचे बोलले जात असून, या सत्ताबदलाच्या नांदीत विद्यमान उपनगराध्यक्षांसह सभापतीसुद्धा सहभागी आहेत. सध्या चौदा नगरसेवक सहलीवर गेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आता फक्त तीन नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. सत्ता बदलाच्या या नांदीत काय होणार हे लवकरच कळणार आहे. दरम्यान, सत्तास्थापनेवेळी सर्वांना विश्वासात घेतले नाही म्हणून काँग्रेसच्या २ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या नगरसेवकांनी याविरोधात अपिल केले आहे. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. तो लवकरच लागणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन झालेल्या विकासकामाची माहिती दिली. मात्र या हालचालीविषयी आम्हास काही माहिती नाही, असे सांगितले. एका वर्षाचा कार्यकाळ मिळाला असला तरी सहा महिने आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना ठोस कामे करता आली नाहीत.
काँग्रेसने सोडली होती नगराध्यक्षपदाची संधी
नगरपंचायतीत राष्ट्रवादीकडे सात, काँग्रेसकडे सहा तर भाजपकडे एका अधिकृत नगरसेवकांस तीन अपक्ष भाजप सहयोगी नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे समीकरण जुळत असताना काँग्रेसने सुरुवातीला अपक्षांच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला केला होता. परंतु, नगराध्यक्ष निवडीच्या वेळी एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे सत्तेजवळ असताना राष्ट्रवादीने खेळी करत काँग्रेसला स्पर्धेच्या बाहेर फेकले होते. नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती, तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख रऊफ विजयी झाले होते.