भरधाव बस घुसली घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:06 AM2018-02-08T00:06:30+5:302018-02-08T00:07:02+5:30
औरंगाबादहून अकोल्याकडे जाणारी भरधाव बस समोरून येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने घरात घुसली. जालना तालुक्यातील जामवाडीजवळील श्रीकृष्णनगर येथे ही घटना मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना, जामवाडी : औरंगाबादहून अकोल्याकडे जाणारी भरधाव बस समोरून येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने घरात घुसली. जालना तालुक्यातील जामवाडीजवळील श्रीकृष्णनगर येथे ही घटना मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका जालना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबादहून अकोल्याकडे ९६ प्रवासी घेऊन बस जालन्याहून रात्री अकरा वाजेच्या सुमारास निघाली. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव येथे जाणा-या भाविकांची संख्या बसमध्ये अधिक होती. तालुक्यातील जामवाडी परिसरातील श्रीकृष्णनगर येथे समोरुन आलेल्या ट्रकने हुलकावणी दिल्याने बसचालक संदीप दंदी यांनी प्रसंगावधान राखले. याच वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाळू भीमराव इंगळे यांच्या घरात भरधाव बस घुसली. या घटनेत इंगळे यांच्या मालकीची रिक्षा आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विशेष म्हणजे इंगळे यांनी काही दिवसांपूर्वीच रिक्षा नवीन खरेदी केली होती. यात रिक्षाचे अधिक नुकसान झाले. तर बसमधील १४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णलयात उपचार सुरु आहेत.
निर्मला जाधव (चिखली), जया भंडारे (चिखली), अजय पवार (अकोला), शेख उमान शेख लुकाम (खामगाव), नंदा नीलेश इंगोले (औरंगाबाद), अन्सार शहा (राजापूर), गणेश टेकाडे (अमरावती), वैशाली डोंगरे (बुलडाणा), देवचंद जैन (चाळीसगाव), सलीम खान नूर खान (चिखली), तमिजा बी शेख रशीद (चिखली) आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.
ग्रामस्थ आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल केले. बसचालकाच्या बाजूला बसलेले गणेश टेकाडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसचालक संदीप दंदी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.