एस.टी.त १५ टक्के उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:31 AM2021-05-08T04:31:12+5:302021-05-08T04:31:12+5:30
कोरोनाने एस.टी.ची चाके थांबली आहेत. आधीच खासगी वाहतूक, अवैध वाहतुकीने एस.टी.चे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून म्हणजेच ...
कोरोनाने एस.टी.ची चाके थांबली आहेत. आधीच खासगी वाहतूक, अवैध वाहतुकीने एस.टी.चे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून म्हणजेच गेल्या वर्षीपासून एस.टी.च्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. एप्रिल महिन्याचा पगार कसा करावा, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे काेरोना आणि दुसरीकडे एस.टी.ची चाके रुतल्याने हे महामंडळ प्रचंड अडचणीत सापडले आहे. त्यातच निमसरकारी मंडळ असल्याने वेतनाची हमी शासन पातळीवरून घेतली जात नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल विभागातील कुशल कामगारांना बोलावेच लागत आहे. १५ टक्के उपस्थितीचा नियम हा केवळ कार्यालयीन कामकाजासाठी पाळला जात असल्याचे एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
चालक-वाहकांसह १०० टक्के कर्मचारी गैरहजर
जालना विभागात जवळपास २३० एस.टी.च्या बस आहेत. पैकी केवळ एकच बस, तीदेखील जालना ते औरंगाबाद सुरू आहे. याचा मोठा फटका एस.टी. महामंडळाला बसला असून, दररोजचे नुकसान हे सरासरी २२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया
जालना येथील आगारात चालक म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. कोरोनाने आमचे सर्व वैभव हिरावले आहे. ऐन लग्नसराईच्या काळात एस.टी. ठप्प होणे ही चांगले नाही.
- दादाराव ढेकळे, चालक
जालना येथील आगारात आपण गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहोत. परंतु अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. आज एस.टी.चे चाक फिरले तरच आमचा पगार होतो. आता स्थिती आणखी गंभीर झाली आहे. - विजय देशपांडे, वाहक
जालना जिल्ह्यात एकूण चार आगार आहेत. त्यांतील जालना आगार हे सर्वांत महत्त्वाचे असून, येथे येणाऱ्या जाणाऱ्या एस.टीं.ची संख्या ही लक्षणीय आहे. परंतु कोरोनाने आमचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आम्ही सर्वजण चिंतेत आहोत. हा कोरोना कहर कधी संपतो त्याकडे लक्ष लागून आहे.
- प्रमोद नेव्हूल, विभागीय नियंत्रक