दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:21 AM2020-01-02T01:21:02+5:302020-01-02T01:21:26+5:30
जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनेनुसार दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले होते, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यामध्ये दीड लाखापर्यंतच्या कर्जाला सशर्त सक्ती दिली होती. त्यामध्ये अल्पमुदत पीककर्ज व मध्यम मुदतीच्या कर्जाला माफी मिळाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात दोन लाखांच्या वरती कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शेतक-यांनाही कर्जमाफीची प्रतीक्षा लागून आहे.
जिल्हाभरात २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. यातील जवळपास दीड लाख शेतक-यांचे कर्ज हे २ लाखाच्या आत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे दीड लाख शेतक-यांना महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दरवर्षी खरीप आणि रबी हंगामात बियाणे, खत, पेरणी, शेतीची मशागत करण्यासाठी अर्थिक मदत म्हणून शेतक-यांना पीक कर्जाचा आधार असतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पीककर्ज घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पीककर्ज न फेडल्यामुळे तेचे व्याजही वाढत आहे.
आढावा : याद्या तयार करण्याचे काम सुरू
शेतकरी लागवडीसाठी दरवर्षी विविध बँकांकडून कर्ज घेतात. या पीककर्जातून शेतकरी पिकांवर औषध फवारणी, खत टाकणे इ. कामे करतात. २०१६-१७ यावर्षात जिल्हाभरातील १ लाख ८८ हजार १५२ शेतक-यांना १ हजार ४०० कोटींचे कर्ज देण्यात आले होते.
२०१७-१८ मध्ये १ लाख २३ हजार ६३८ शेतक-यांना ४१३ कोटींचे पीककर्जाचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये १ लाख ६२ हजार ३७५ शेतक-यांना १ हजार ९६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
अद्याप संंभ्रम
शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात पीक कर्ज असा उल्लेख आहे. मात्र, अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत यापैकी कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, याबाबत बँकांना स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. केवळ पीक कर्जाचा उल्लेख असल्यामुळे अल्पमुदतीचे पीककर्जच माफ होणार असल्याचे सरकारी व बँकांना सूत्रांनी सांगितले.