जालन्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:37+5:302020-12-30T04:40:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...

153 applications filed in Jalna | जालन्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल

जालन्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. सोमवारी एकूण १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.

जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून, मंगळवारी ११ ते ३ यावेळेतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता तर दुसऱ्या दिवशी केवळ दोन, तिसऱ्या दिवशी तब्बल १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत १५५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार भुजबळ यांनी दिली. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी उमेदवारांच्या शंकांचे समाधान केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, ३१ डिसेंबर रोजी जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनचे जी. एल. सुर्वे, पी. एस. रायमल, के. के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय. आर. कुलकर्णी, के. आर. डहाळे यांनी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश पाठवले आहेत. जवळपास १,६५० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भोकरदन येथे १५१ अर्ज दाखल

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी १५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांनी दिली. दिनांक २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज प्रथम आॅनलाईन केल्यानंतर त्याची प्रत तहसील कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अर्ज दाखल करण्यास उशीर झाला आहे.

मंठ्यात १५५ उमेदवारी अर्ज दाखल

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मंठा तहसील कार्यालयात १५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या निमयांचा पुरता फज्जा उडाला होता.

दिनांक २३ डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, २३ आणि २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी उमेदवारांनी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी १५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात आता या निवडणुकीचे वातावरण तापत आहे. राजकीय नेत्यांनीही बैठका सुरू केल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी तहसील प्रशासनाने १५ टेबलची व्यवस्था केली होती. यासाठी ५० कर्मचारी कार्यरत होते तर ४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

अंबड येथे ८० अर्ज दाखल

अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, आतापर्यंत ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली. शहरातील महामार्गाचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सोमवारी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरताना विविध अडचणींचा सामना करावा लागला.

Web Title: 153 applications filed in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.