जालन्यात अनुकंपा तत्त्वावर १६ जण झाले तलाठी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
By दिपक ढोले | Published: July 14, 2023 08:21 PM2023-07-14T20:21:54+5:302023-07-14T20:22:22+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
जालना : शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्याचा शासन निर्णय आहे. जालना जिल्ह्यासाठी नव्याने ८० तलाठी साजे निर्मिती करण्यात आले असून, शासनाने व विभागीय आयुक्तांनी या तलाठी साजावर २० टक्के नियुक्ती देण्याचे कळविले आहे. यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील अनुकंपा तत्त्वावर एकूण १६ उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले.
जिल्हा प्रशासनात तलाठी हा ग्रामस्तरावरील महत्त्वाचा घटक असून, महसूल प्रशासनाचा तो कणा आहे, त्यामुळे नियुक्त झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे उत्तम काम करावे व नागरिकांना चांगली सेवा द्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांना मिळाले नियुक्तीपत्र
जालना जिल्हा आस्थापनेवरील महसूल गट-क व सामायिक गट-क संवर्ग अनुकंपा प्रतीक्षा यादीतील धनराज पांडुरंग धुमाळ, राजेंद्र एकनाथ पंडित, गणेश पुंडलिक गायकवाड, महमंद हारेस महमंद कमरोद्दीन, अर्चना भागवत जाधव, अक्षय रवींद्र कुलकर्णी, विशाल सुरेश दळवी, शंकर कोंडिबा दुर्गमवार, आनंद पांडुरंग पंचांगे, विनोद श्रीराम कांबळे, अशोक भानुदास गायकवाड, रूपाली विनोद यादव, विठ्ठल सर्जेराव घुले, रूपाली दिलीप जगदाळे, ज्योती सतीश अवकाळे आणि रंजना रविकिरण वैद्य या उमेदवारांना नियुक्तीपत्राचे आदेश वितरित करण्यात आले.