बर्ड फ्लूसाठी जिल्ह्यात १६ शीघ्र प्रतिसाद पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:33+5:302021-01-15T04:26:33+5:30
विजय मुंडे जालना : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. परंतु, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आढळलेले बर्ड फ्लूचे पक्षी पाहता ...
विजय मुंडे
जालना : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. परंतु, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आढळलेले बर्ड फ्लूचे पक्षी पाहता जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पोल्ट्रीचालकांना दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एका तालुक्यात दोन प्रमाणे १६ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील पक्ष्यांच्या मृत्यूवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पोल्ट्रीचालकांसह कोंबड्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोल्ट्री चालक, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाख कोंबड्या असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन प्रमाणे १६ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमित सकाळी व सायंकाळी तालुक्यातील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. जालना येथील पशुचिकित्सालयात नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला असून, येथे येणाऱ्या पोल्ट्रीचालकांसह नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन केले जात आहे.
११३ पोल्ट्री फार्म
जिल्ह्यात जवळपास ११३ पोल्ट्री फार्म आहेत. यात दहा हजारांवर पक्षी असलेल्या पोल्ट्री फार्मची संख्या पाच आहे, तर इतर १०८ पोल्ट्री फार्ममध्ये एक हजारापेक्षा कमी पक्षी आहेत. तर शेतकऱ्यांसह घरगुती कोंबडी पालन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
शेजाऱ्यांमुळे चिंता
जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. तरी बीड परिसरात काही पक्ष्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे जालना जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. सद्य:स्थितीत जालन्यात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. असे असले तरी दक्षता घेणे आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
तर एक किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांची कत्तल
एखाद्या ठिकाणी बर्ड फ्लूचे पक्षी आढळले तर त्या घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांची कत्तल केली जाणार आहे. जेसीबीने मोठा खड्डा खोदून शास्त्रीय पद्धतीने या पक्षांची विल्हेवाट लावली जाणार आहे, तर दहा किलोमीटर अंतरामध्ये संबंधित पक्ष्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.
जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. असे असले तरी वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. चिकन, अंडी खाणाऱ्यांनी ती उकडून खाल्ली तर त्यांना कोणताही धोका उद्भवत नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोठे पक्षी मृत आढळले तर पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.
अमितकुमार दुबे
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन