लॉकडाऊनच्या काळात १६ दुकाने फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:33 PM2020-04-30T18:33:25+5:302020-04-30T18:34:21+5:30
तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जालना : लॉकडाऊनच्या काळात शहरातील १६ दुकाने फोडणाºया टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली असून, संबंधितांकडून ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून शहरातील मोंढ्यामधील दुकाने फोडण्याचे सत्र सुरू होते. या चोरी प्रकरणात हात असलेल्या आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी रात्री कैकाडी मोहल्ला व जवाहरबाग परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सचिन बाबू गायकवाड, राम सखाराम निकाळजे व एका अल्पवयीन चोरट्यास जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्या चोरट्यांनी १६ दुकाने फोडल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ६ गुन्ह्यातील चोरलेले कपडे, एलईडी टीव्ही, तीन मोबाईल, ड्राय फूडस्, रोख रक्कम पाच हजार, हेडफोन, हार्डडिस्क आदी ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रंजित वैराळ, विलास चेके, हिरामण फलटणकर, रवि जाधव, पूनम भट्ट, सुरज साठे, पैठणे यांच्या पथकाने केली.
या दुकानात केली चोरी
या चोरट्यांनी १८ एप्रिल रोजी दवा मार्केटमधील वरद ड्रेसेस, मराठवाडा कृषी केंद्र, श्रीनिवास एजन्सी, राज एजन्सी आयुर्वेदिक होलसेल, सत्यनारायण ट्रेडर्स, जुना मोंढा, ऋषी किराणा, प्रवीण शर्मा यांचे दुकान फोडले. तर १९ एप्रिल रोजी फुले मार्केटमधील साई मोबाईल शॉपी, माऊली किराणा, गजानन किराणा अशी तीन दुकाने फोडली. २४ एप्रिल रोजी भोकरदन नाका ते नवीन मोंढा येथील साईराम डेली निडस्, प्रतिक अॅग्रो एजन्सी, पानटपरी अशी तीन दुकाने फोडली. २८ एप्रिल रोजी जुना मोेंढा येथील सतिश ट्रेडर्स, टेक्नोशॉप सोल्यूशन, पराग शेतकरी गोडाऊन अशी तीन दुकाने फोडली. तसेच २८ एप्रिल रोजी जुना मोंढा येथील एका वॉचमनला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईलही चोरट्यांनी चोरून नेला होता.
यापूर्वीही जप्त केला सहा लाखाचा माल
स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या आरोपींना गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चोºया, घरफोड्या, चैन स्नॅचिंग आदी विविध गुन्ह्यात जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.