जाफराबादसह १८ गावे रात्रभर अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:16 AM2017-11-24T00:16:46+5:302017-11-24T00:16:54+5:30
३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : येथील ३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे. उपकेंद्रातील अंतर्गत पुरवठा करणा-या केबल वायरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडला आहे.
जाफराबाद ३३ केव्ही उपकेंद्रातून शहरासह परिसरातील जवळपास १८ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. दुस-या दिवशी महावितरणच्या कर्मचा-यांनी सकाळी केबल दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, हे काम जाफराबाद महावितरण कर्मचा-यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने दुरुस्तीसाठी जालन्याच्या विशेष पथकाला बोलवण्यात आले. याचा बँका, पाणी पुरवठा व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या कामावर परिणाम झाला. सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. अंधारातच रात्र निघून गेली तरी वीज आली नाही.
जाफराबाद ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत जानेफळ पंडित, भारज, आळंद, आसई ही तीन सहउपकेंदे्र असून या भागातील वीजपुरवठा बंद आहे. मुख्य केबल लाईन ही अर्थिंग वायरल टच होऊन केबल जळाली. गुरुवारी सायंकाळी फक्त जाफराबाद शहराचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. इतर गावातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जास्तीचा वेळ लागणार असल्याचे उपअभियंता मुलानी यांनी सांगितले.