जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार
By विजय मुंडे | Published: July 29, 2023 04:53 PM2023-07-29T16:53:54+5:302023-07-29T16:54:25+5:30
ज्ञानमंदिरात जाऊन पुन्हा मुलांना देणार धडे; सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केला अर्ज
जालना : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षकांनी ज्ञानमंदिरात जाऊन मुलांना धडे देण्याची तयारी दर्शविली आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५०२ शाळांमध्ये एक लाख ४७ हजार २८७ मुलं शिक्षण घेतात; परंतु या शाळांमध्ये मराठी माध्यमातील ५६७ तर उर्दू माध्यमातील ५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषत: शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी पालकांनी कधी शाळेला टाळे ठोकले, कधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले तर कधी चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरविली; परंतु तात्पुरत्या पर्यायाशिवाय कायम शिक्षक काही शाळांना मिळाले नाहीत. भोकरदन तालुक्यातील पालकांनी तर चक्क बेमुदत उपोषण सुरू केले होते; परंतु मुलांच्या आग्रहास्तव हे उपोषण मागे घेण्यात आले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रतिसाद देत शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत.
६२५ पदे रिक्त
जिल्ह्यात शिक्षकांची एकूण ६२५ पदे रिक्त आहेत. त्यात मराठी माध्यमाची ५६७ तर उर्दू माध्यमाच्या ५८ जागा रिक्त आहेत. ६२५ शिक्षक नसल्याने अनेक शाळांवरील कामकाजाचे नियोजन कोलमडले असून, त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे.
१८९ शिक्षकांची बदली, आले केवळ १२२
- जिल्ह्यातील १८९ शिक्षकांची बदली झाली आहे. त्यात मराठी माध्यमाचे १८१ तर उर्दू माध्यमाच्या ८ शिक्षकांची बदली झाली आहे. जिल्ह्यातून १८९ शिक्षक इतर जिल्ह्यात गेले आहेत. इतर जिल्ह्यातून येणारे सर्व शिक्षक मात्र आलेले नाहीत.
- जिल्ह्यात केवळ १२२ शिक्षक हजर झाले आहेत. त्यात मराठी माध्यमाचे १२२ आणि उर्दू माध्यमाचे ६ शिक्षक आले आहेत. अद्यापही मराठी माध्यमाचे ४८ आणि उर्दू माध्यमाच्या एका शिक्षकाची प्रतीक्षा शिक्षण विभागाला आहे.
नियुक्तीची प्रक्रिया निर्देशानुसार करू !
शासन निर्देशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांनी कंत्राटी तत्त्वावर रुजू होऊन मुलांना ज्ञानदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. आजवर १८३ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज आले आहेत. या शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया शासन निर्देशानुसार केली जाणार आहे.
- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी
शाळा अन् विद्यार्थी संख्या
तालुका शाळा- विद्यार्थी
अंबड- २११- २३१०४
बदनापूर- १५८- १३८९२
भोकरदन- ३०५- २८१५१
घनसावंगी- १७३- १९७०७
जाफराबाद- १४८- १३९५०
जालना- २२८- २१३७१
मंठा- १४९ - १२४६६
परतूर- १३०- १४६४६