जालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:09 PM2020-03-26T23:09:37+5:302020-03-26T23:10:15+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली

19 fast response teams in Jalna district | जालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके

जालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ६१ वर गेली असून, त्यातील ५५ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली असून, १५ अलगीकरण कक्षात १५३९ खाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दिवसभर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीसह तीनचाकी, चारचाकी वाहन चालकांना पोलिसांनी चांगलेच फटके दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जीवनावश्यक साहित्य विक्री करणा-या आस्थापनांसमोर चुन्याद्वारे मार्किंग केले जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स राहण्यास मदत होत आहे. शिवाय रिक्षा, पोलीस वाहनातून कोरोनाबाबत जागृती करण्यात येत असून, नागरिकांनी घरात रहावे, असे आवाहन केले जात आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी निर्मनुष्य असलेले रस्ते दुस-या दिवशी गुरूवारी नागरिकांच्या वर्दळीने फुलून गेले होते. रस्त्यावर विनाकारण फिरणाºया नागरिकांना चौका-चौकात उभा असलेल्या पोलिसांनी चांगलेच फटके दिले. तसेच मास्क न घालता फिरणाऱ्यांनाही पोलिसांनी चोप देत मास्क वापरण्यास सांगितले. विशेष म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे अनेक नागरिक हे मास्क न वापरता फिरत होते. त्यांचीही चांगलीच फिरकी घेत पोलिसांनी त्यांना मास्क वापरण्याबाबत सूचना दिल्या.
जालना जिल्ह्यात एकूण १५ संस्थांची अलगीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी १ हजार ५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके, २०८ आरोग्य पथके व शहरी भागातही आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत देशातून, बाधित भागातून आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ज्यांना तीव्र लक्षणे दिसून येतात अशा रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वेक्षण केले जात असून, पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली तर रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे.
नागरिकांनी एकत्रित येऊ नये : रवींद्र बिनवडे
जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एका ठिकाणी जमा होऊ नये, अशा सूचना जिल्हा दंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिल्या आहेत. गल्ली-बोळात, रस्त्यावर एकत्रित थांबणा-यांवर कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी घरातच रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही बिनवडे यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तंूची चढ्या दराने विक्री करू नका
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तंूची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे औषध विक्रेते, किराणा व्यवसायिक, भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी चढ्या दराने साहित्याची विक्री करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिल्या आहेत. चढ्या दराने साहित्याची विक्री करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही बिनवडे यांनी दिला आहे.
२१२ जणांची आरोग्य तपासणी
राज्यातून व इतर राज्यातून आलेल्या २१२ नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे. लक्षणे असणा-यांवर उपचार करुन स्वत:च्या घरात अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूचा एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही.
डोणगावच्या मुख्य रस्त्यावर कातड्या
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील डोणगावमध्ये प्रवेश करणा-या रस्त्यांवर चक्क कातड्या लावण्यात आल्या आहेत. गावात इतर कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. या कामी सरपंच अरुणा सुनील जाधव यांच्यासह इतर युवकांनी पुढाकार घेतला आहे.
एकच रस्ता मोकळा ठेवण्यात आला असून, तेथे चेकपोस्ट बनविले आहे. या कामी गावातील मिलिंद जाधव, शेख सईद, राजू गवई, सय्यद मुस्तफा, शेख जमील, शाहरुख पठाण, साजिद कुरेशी, इर्शाद पठाण, मधुकर पुंगळे, सय्यद मुस्तकीम, शेख शाहिद, शेख निसार, शेख साजिद प्रयत्न करीत आहेत.

Web Title: 19 fast response teams in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.