१९ तासांची शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:16 AM2019-07-21T00:16:02+5:302019-07-21T00:16:31+5:30
१४ वर्षीय मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेच्या १९ तासानंतर शनिवारी दुपारी मयताचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / आन्वा (जालना) : पोहण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील आन्वा शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडली असून, घटनेच्या १९ तासानंतर शनिवारी दुपारी मयताचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
अयान खान इम्तियाज खान (१४, रा. भवानी पेठ, विक्रम काबाडा, पुणे ह़मु़ आन्वा) असे मयत मुलाचे नाव आहे. अयान खान हा आन्वा येथील जामिया इस्लामिया रियाजुल ऊलूम मदरसा येथे शिक्षणासाठी राहत होता. १९ जुलै रोजी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अयानखान इम्तियाजखान (१४) काही मित्रांसमवेत जवळच असलेल्या पाझर तलावाकडे पोहण्यासाठी गेला. तलावात पोहत असताना अयानखान इम्तियाजखान हा पाण्यात बुडाला. या घटनेने घाबरलेल्या मुलांनी मदरशाकडे धाव घेतली.
मदरशामधील शिक्षक नेहमीप्रमाणे सायंकाळी मुलांच्या उपस्थितीची हजेरी घेत होते. त्यावेळी आयानखान हा मुलगा गैरहजर दिसून आला. त्याच्याबद्दल इतर मुलांना विचारले असता तो पोहण्यासाठी तलावाकडे गेल्याचे शिक्षकांना समजले.
त्यानंतर शिक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शिक्षक मुजीब पठाण यांनी पारध पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
२० जुलै रोजी सकाळी आन्वा पाडा शिवारातील तलावात अब्दुल रहेमान चाऊस, देवसिंग मिमरोट, संजय घुसिंगे, विजय अवघडराव, अफजल कुरेशी या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्या मुलाच्या पार्थिवाचा शोध सुरू केला. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अयानखान याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यावेळी सपोनि शंकर शिंदे, नायब तहसीलदार के.टी़ तांगडे, सरपंच मदन कुलवाल, पोलीस कर्मचारी प्रकाश शिंनकर, समाधान वाघ, डुकरे, मंडळ अधिकारी एस. एस़ बोटोळे, तलाटी आऱ बी़ कांबळे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.