जालना जिल्ह्यातील ३९ प्रकल्प कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:45 AM2019-09-17T00:45:36+5:302019-09-17T00:45:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के उपयुक्त पाणी आहे. जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक असून, १७ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली आहे.
पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी गावा-गावातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १७ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तर ३ प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. एका प्रकल्पात २६ ते ५० टक्के, एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर तीन प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणी आहे. या तीन प्रकल्पांमध्ये साधारणत: ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात भोकरदन तालुक्यातील रेलगाववाडी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज लघू पाझर तलावात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
जायकवाडी प्रकल्प भरल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. या नदीपात्रातील बॅरेजमुळे संबंधित गाव, शिवारातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, इतर शहरी, ग्रामीण भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यात असलेल्या ७ बंधाऱ्यांपैकी केवळ दोन बंधाºयांमध्ये ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. तर इतर बंधा-यांमध्येही पाणीसाठा झालेला नाही.
दरम्यान, पुढील आठ- दहा दिवसात मोठा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न यंदाही मोठा गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तर जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण व जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा हे प्रकल्प जोत्याखाली आहेत. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पही जोत्याखाली आहे. तर तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही कोरडाठाक आहे.
मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ८.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा याच कालावधीत मध्यम प्रकल्पांमध्ये २१.२३ टक्के उपयुक्त पाणी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी प्रकल्पांची तहान मात्र कायम आहे. त्यामुळे पुढील कालावधीत तरी जिल्ह्यात मोठा पाऊस पडेल, अशी आशा सर्वसामान्यांना लागली आहे.