४९५ कर्ज खात्यात अडीच कोटी वर्ग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:00 AM2020-02-28T00:00:39+5:302020-02-28T00:02:30+5:30
महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गत चार दिवसात ७९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गत चार दिवसात ७९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे. यातील ४९५ शेतकऱ्यांच्या कर्ज कर्जखात्यावर २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपयांची रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात आली आहे.
महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार २६७ शेतक-यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शासनाच्या प्राथमिक यादीत २४ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी व टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची यादी प्रसिध्द झाली होती. या प्रक्रियेत मागील चार दिवसांमध्ये गुरूवारपर्यंत ७९२ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा लाभ घेतला आहे. पैकी ४९५ शेतक-यांचे २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपये शासनाकडून संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यात जिल्हा बँकेतील १५० शेतक-यांचे ४१ लाख ५८ हजार ८७७ रूपये, बँक आॅफ महाराष्ट्रच्या १९२ शेतक-यांचे १ कोटी ५७ लाख रूपये, एसबीआयच्या १२० शेतक-यांचे २५ लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ११ शेतक-यांचे १४ लाख २० हजार १०९ रूपये, बँक आॅफ बडोदाच्या एका शेतक-याचे ३९ हजार रूपये असे एकूण २ कोटी ५० लाख ३९ हजार ८१९ रूपये रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
उर्वरित शेतक-यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील २५ शेतक-यांच्या तक्रारी
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत बँक खाते, आधार क्रमांकात चुका असल्याची तक्रार दोन गावातील २५ जणांनी केली आहे. यातील तीन तक्रारी जिल्हा समितीकडे आल्या असून, उर्वरित २२ तक्रारी तहसीलदारांकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचेही तातडीने निरसन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आज दुसरी यादी
येण्याची शक्यता
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्राथमिक यादीत दोन गावातील ११०२ शेतक-यांची यादी प्रसिध्द झाली होती. शासन निर्णयानुसार आज २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.