पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:46 IST2019-01-12T00:46:25+5:302019-01-12T00:46:55+5:30
भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे.

पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तो अबाधित राखण्यासाठी रिक्त पोलिस पाटलांची पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी गांव कामगार पोलिस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भोकरदनचे उपविभागीय अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांच्याकडे देण्यात आले.
ग्रामीण भागात महसूल व पोलिस प्रशासनाचा दुवा म्हणून पोलिस पाटलाकडे बघितले जाते. बहूतांशी किरकोळ वाद तंटे पोलिस पाटील गावात समन्वयाने मिटवतात. पोलिसांचा भार कमी होण्यासाठी प्रत्येक गावात पोलिस पाटील असणे आवश्यक आहे. शासनाने गेल्या अकरा वर्षापासून पोलिस पाटील पदाची भरती केलेली नाही. त्यामुळे रिक्त असलेल्या गावात किरकोळ कारणासाठी पोलिसांना वेळ द्यावा लागतो.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील २५५ गावांपैकी ६२ गावात पोलिस पाटील कार्यरत आहे. यामध्ये १९३ गावांची पदे रिक्त आहे. हसनाबाद पोलिस ठाण्याअंतर्गत ४२ गांवे येतात, यामध्ये ८ गावात पोलिस पाटील कार्यरत असून ३४ गावात पद रिक्त आहे.
तसेच भोकरदन पोलिस ठाण्यातंर्गत ७६ गावांपैकी १८ गावात पदे भरलेली असून ५७ गावात पोलिस पाटील नाही. पारध पोलिस ठाण्यातंर्गत ३२ गावे असून १० गावात पोलिस पाटील आहे, तर २२ गावात रिक्त आहे.
जाफाराबाद पोलिस ठाण्यातंर्गत ६० गावे येतात. यामध्ये १७ गावात पोलिस पाटीलांचे पद भरलेले आहेत तर ४३ गावे पोलिस पाटलांच्या प्रतिक्षेत आहे.