१९७६ अंगणवाड्यांना १३ दिवसांपासून कुलूप; अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर 

By विजय मुंडे  | Published: December 16, 2023 07:34 PM2023-12-16T19:34:49+5:302023-12-16T19:35:03+5:30

पोषण आहारासह पूर्व प्राथमिक शिक्षण ठप्प

1976 Anganwadis locked for 13 days; Anganwadi workers, helpers on strike | १९७६ अंगणवाड्यांना १३ दिवसांपासून कुलूप; अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर 

१९७६ अंगणवाड्यांना १३ दिवसांपासून कुलूप; अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर 

जालना : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या असून, गत १३ दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप कायम आहे. परिणामी मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने देवून मोर्चे काढण्यासह आंदोलनेही करण्यात आली आहेत. परंतु, शासन, प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यात १६८३ अंगणवाडी केंद्र, २९३ मिनी अंगणवाडी सेविका आहेत. त्यात जवळपास दीड लाखावर बालके पूर्वप्राथमिक शिक्षण घेतात. परंतु, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झालेली आहेत. शासनस्तरावरून मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घेतली आहे.

या आहेत मागण्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून ग्रच्युटी, पेन्शन,भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा देण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

मोर्चा काढला जाणार 
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून, सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
- कॉ. अण्णा सावंत, जालना

अशी आहे आकडेवारी
अंगणवाडी केंद्र- १६८३
मिनी अंगणवाडी- २९३
बालके- १५४८०७

Web Title: 1976 Anganwadis locked for 13 days; Anganwadi workers, helpers on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.