साडेतीन लाखांच्या ३३ मोबाईलसह दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:22 AM2018-11-02T00:22:45+5:302018-11-02T00:22:59+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष मोहीम राबवत दोन मोबाईल चोर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष मोहीम राबवत दोन मोबाईल चोर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सागर बबन ढाकणे (२१), अतिष रंजीत आडसूळ (१९) (दोघे रा. संभाजी नगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, जालना बसस्थानका जवळ एक इसम नवीन मोबाईल घेऊन जात असताना त्यास सागर ढाकने व अतिश आडसूळ यांनी मारहाण करुन हिसकावून नेला. या माहितीवरुन त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्ह््याची कबुली दिली. त्यानंतर त्यांची पुन्हा कसून चौकशी केली असता, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वेस्थानक, आठवडी बाजार, मंदिरे यासह आदी ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेत एकूण ३३ कंपनीचे स्मार्ट फोन चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार ४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे, प्रशांत देशमुख, विनोद डदे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, संदीप मांटे, विलास चेके, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, रवि जाधव यांनी केली.
विशेष कृती दलाने केले सात मोबाईल जप्त
जालना : विशेष कृती दलाने गुरुवारी एका इसमाकडून ४२ हजार ५०० रुपयांचे मोबाईल सात मोबाईल जप्त केले. बालाजी सीताराम चव्हाण (रा. कुदळा, जि. हिंगोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी परिसरात सप्तश्रुंगी कंपनीसमोर एक इसम हा चोरीचे सहा ते सात मोबाईल घेऊन विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहे. या माहितीवरून विशेष कृती दलाच्या पथकाने बालाजी चव्हाणला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले.
त्याच्याकडून ४२ हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चेतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, नंदकिशोर कामे, किरण चव्हाण यांनी केली.