२० कोटींची बिले ३ मिनिटात मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:51 AM2019-09-10T00:51:52+5:302019-09-10T00:52:46+5:30
गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.
ही विशेष सभा मध्यंतरी औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळे होऊ शकली नाही. आणि आता पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. ही बाब लक्षात घेता तातडीने विशेष सभा सोमवारी घेण्यात आली.
जालना पालिकेची विशेष सभा सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह विषय समित्यांचे सभापती तसेच मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी गेल्या आर्थिक वर्षात रस्ते, देखभाल दुरूस्ती यासह विविध कामांची जवळपास २० कोटी रूपयांपेक्षा अधिकची देयके मंजुरीविना रखडली होती. या बिलांना मंजुरी देताना सभागृहात कोणत्याही नगरसेवकाने आक्षेप न घेता मंजूर- मंजूरच्या घोषणेत मान्यता देण्यात आली.
गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. असे असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे, बंद पथदिवे आणि स्वच्छतेचा मुद्दा सभागृहात गाजला. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले, भाजपचे गटनेते अशोक पांगरकर, भास्कर दानवे यांच्यासह महिलांनी आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडले. बहुतांश ठिकाणी पथदिव्यांचा मुद्दा गाजला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मध्यस्थी करून गणेश विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्ग, पथदिवे सुरू करण्याचे निर्देश दिले.
जलवाहिनीच्या मुद्यावर चर्चा
सभागृहामध्ये अंतर्गत जलवाहिनीचा मुद्दा देखील पुन्हा चर्चिला गेला. शहर तसेच आसपास मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक नगरसेवकांनी सांगितले. मुख्याधिकारी नार्वेकर यांनी यामध्ये लक्ष घालून गळतीचे कारण शोधले जाईल, असे सांगितले.