बोनस मिळाल्याच्या नावाखाली ६ जणांना २ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:14+5:302021-08-02T04:11:14+5:30
सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्याचा धोकाही तेवढाच आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटोंचा वापर, ब्लॅकमेलिंग, भावनिक आवाहन करून ...
सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्याचा धोकाही तेवढाच आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटोंचा वापर, ब्लॅकमेलिंग, भावनिक आवाहन करून पैशांची मागणी, बदनामी करण्याच्या उद्देशाने अकाऊंट हॅक करण्यात येत आहे. दुसरीकडे ओटीपी व फोन पे, पेटीम, गुगल पेद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सावधानपूर्वक करणे गरजेचे झाले आहे. आता तर फोन पे, पेटीम, गुगल पेद्वारे आपण एखाद्या व्यक्तिला पैसे पाठवत्यावेळी आपल्याला कंपनीकडून काही ऑफर्स दिल्या जातात. त्याचा काही व्यक्ती गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. पेटीम, फोन पे व गुगल पे आदी ॲपवर आपल्याला बोनस मिळाल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घातला जात आहे. तुम्हाला बोनस मिळाला आहे, त्यासाठी कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल, असे सांगून तब्बल सहा जणांना दोन लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.
ठाणेनिहाय दाखल गुन्हे
पोलीस ठाण्याचे नाव दाखल गुन्हे अंबड १
तालुका २
सदर बाजार २
कदीम १
अशी होते फसवणूक
पेटीएम, फोन पे, गुगल पे आदी ॲपवर आकर्षक सूट दिली जाते. याचाच काही जण फायदा घेतात. कंपनीच्या नावाने फोन करून कागदपत्रांची माहिती मागितली जाते. काही लोक कुठलाही विचार न करता आपल्या कागदपत्रांची माहिती देतात. त्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या खात्यातून रक्कम काढून घेते.
नागरिकांनी फोन पे, पेटीएम, गुगल पे या ॲपचा वापर करताना काळजी घ्यावी. कोणालाही कागदपत्रांची माहिती देऊ नये. जिल्ह्यात बोनस मिळाल्याच्या नावाखाली तब्बल ६ जणांना फसविले आहे.
मारुती खेडकर, पोनि. सायबर विभाग, जालना