जालना जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी आले २ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 07:14 PM2019-03-16T19:14:00+5:302019-03-16T19:15:00+5:30
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड आणि शाळांची उदासिनता आदी कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.
जालना : आरटीई अंतर्गत उपलब्ध ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी २२ मार्च ही अतिंम तारीख असून, पालकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
आर्थिक दुर्बल घटक आणि मागास बालकांना अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअल्पसहाय्य शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून २१६ शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड आणि शाळांची उदासिनता आदी कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.
मागील काही वर्षांपासून शिक्षण संचालक विभागाने आरटीई प्रवेशाचे नियम कडक करून प्रवेशासाठी पालक राहत असलेल्या जागांचे अंतर आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे भाडेपट्टीची अट ठेवल्याने बनावट पध्दतीने प्रवेश मिळविणा-यांना चाप बसला असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध जागांपैकी दरवर्षी अनेक जागा रिक्त राहत आहेत. यावर्षी १६ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी २२ मार्चपर्यंत अतिंम तारीख असून, १ हजार ४३२ जागा रक्त राहण्याची शक्यता आहे.