२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:12 AM2019-01-09T00:12:53+5:302019-01-09T00:13:16+5:30
अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोंद्री / गोंदी : अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक महसूल प्रशासनासह वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
या पथकाने जवळपास २ हजार २२६ ब्रास वाळूसाठे जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, या पथकाने गोदावरी नदी पात्राचे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यामातून चित्रीकरणही केले.
या आयुक्तांच्या पथकाने मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भेट देऊन ही कारवाई केली. या पथकात आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या सूचनेनुसार बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे या पथकात परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, बीडचे बी. एल. कांबळे, पाथरीचे बी. एल. कोळी, वसमतचे प्रवीण फुलारी, परळीचे गणेश महाडिक, विद्या धरवडकर, जालन्याचे पाटील
यांच्यासह माजलगाव, पाथरी येथील तहसीलदार मंडळाधिकारी, तलाठी यांचा समावेश होता. या कारवाई दरम्यान हसनापूर गोदावरी पात्रात ४४ ब्रास, गोंदी गोदापात्रात ९०५ तर लक्ष्मीआई मंदिराजवळ ७१७ ब्रास, पाथरवाला ४१० ब्रास तसेच बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथे १५० ब्रास वाळू, अशी एकूण २ हजार २२६ ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा करून जप्त करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदी पात्रात जालना तसेच बीड जिल्ह्यातील वाळू माफियांनी हैदोस घातला होता. दरम्यान यापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही सहा महिन्यांपूर्वी गोदापात्रात अचानक भेट देऊन मोठा वाळूसाठा जप्त केला होता.